कोल्हापुर : बदलापूर शहरात अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर बदलापुरमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन केलं. हे आंदोलन निवळत नाही, तोपर्यंत कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. 73 वर्षांच्या नराधमाकडून नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसर हादरुन गेले आहेत.
श्रीपती भोसले (वय-73) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी येथील खासगी क्लासमध्ये शिकत असणाऱ्या नऊवर्षीय चिमुकलीवर 73 वर्षीय व्यक्तीकडून जुलै 2024 ते 6 सप्टेंबर दरम्यान लैंगिक अत्याचार करण्यात आलं आहे. याबाबत कुणाला सांगितले तर शपथ आहे, असे सांगून तुझे आजोबा, आजी, भाऊ, आई-वडील मरतील अशीही धमकी दिली.
राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या खासगी क्लासमध्ये आरोपी श्रीपती भोसले या इसमाने पिडीतेला क्लासमध्ये बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो कायदा अंतर्गत श्रीपती भोसले व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. राधानगरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पो.नि. संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.