पुणे : पुणे शहरात वाहनचोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाहन चोरीबाबत कारवाई करण्याच्या पोलीस आयुक्तांकडून सुचना देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून, आरोपी अभिषेक शरद पवार (वय-36 वर्षे, रा. गुरुवार पेठ, पंचहाऊस टॉवर जवळ, जि. पुणे) याला कोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपी सुजित दत्तात्रय कुंभार (वय-36 वर्ष रा. कौहनपुर, खेड शिवापुर, ता. हवेली, जि. पुणे) हा देखील सराईत दुचाकी चोर असल्याची माहीती मिळाल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना आरोपीबद्दल माहिती मिळाली. खालापुर टोलनाका या ठिकाणी गाडीसह येत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस तपास पथकाने सापळा रचुन आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता, त्याने कोरेगाव पार्क, हडपसर, येरवडा, खडक, भारती विद्यापीठ, तसेच शिवाजीनगर या भागातून वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे सांगितले आहे. यापुर्वीही त्याच्यावर पुणे शहरातील मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे.
मात्र, गुन्ह्याच्या तपासामध्ये दोन्हीं आरोपींकडून 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये 10 लाख 77 हजार रुपयांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. वाहन चोरीमध्ये 1 मारुती सुझकी कंपनीची इर्टीका गाडी, 1 टेम्पो, 1 हिरो होंडा पैशन प्लस, 2 स्प्लेंन्डर प्लस, 1 ऍक्टिव्ह, तसेच 1 युनिकॉर्न अशा 2 चारचाकी आणि 5 दुचाकी जप्त केल्या आहेत. या चारचाकी आणि दुचाकी या खालापुर, खडक, येरवडा, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, कात्रज व पुणे शहर, या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोलीस करत आहे.