दीपक खिलारे
इंदापूर : विकासधारा मंचच्यावतीने शहरात २३ ते २७ नोव्हेंबर यादरम्यान पाच दिवसीय राज्यस्तरीय ग्रामविकास कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजिका सीमा कल्याणकर यांनी दिली. विकासधारा मंचच्या वतीने गेली ९ वर्षांपासून इंदापूर येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदा या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे दहावे वर्षे आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या कृषी प्रदर्शनामध्ये एकूण साठ स्टाॅलची उभारणी करण्यात आली असून शेतकऱ्यांना शेतीतील नवतंत्रज्ञान अवगत होण्यासाठी प्रात्यक्षिकांद्वारे माहिती मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील दुग्ध व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांची माहिती या प्रदर्शनात शेतकरी बांधवांना मिळणार आहे, असे आयोजिका सीमा कल्याणकर यांनी सांगितले.
लंपी आजारामुळे अनेक पशुपालकांनी आपली जनावरे विकली आहेत. अशा परिस्थितीत या प्रदर्शनात चांगल्या जातीवंत पशु पालकांना प्रदर्शनात निमंत्रित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे खास आकर्षण असलेले ‘बैलांची रॅम्प वाॅक स्पर्धा’ ऑनलाईन घेतली जाणार आहे. तसेच शनिवारी (दि.२६ ) रोजी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच प्रदर्शन कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.त्यामुळे सदर कृषी प्रदर्शनाचा जिल्ह्यासह, तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजिका व विकासधारा मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.