शिंदखेडा (धुळे) : राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले दिसून येत आहेत. अशात आता शरद पवार हे सुद्धा आक्रमक बघायला मिळाले आहे. सरकार लोकांच्या सेवेसाठी असते. मात्र सत्तेचा माज काही लोकांच्या डोक्यात गेला आहे. सत्तेचा उन्माद सुरू आहे, त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखविण्याचे काम करा, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर केली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार रविवारी धुळ्यातील शिंदखेड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी शिंदखेड्यातील शेतकरी मेळाव्याला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेकडो शेतकऱ्यांनी मेळाव्याला हजेरी लावली होती.
शरद पवार म्हणाले की, बऱ्याच वर्षांनी शिंदखेडा येथे येण्याची संधी मिळाली. अलीकडच्या काळात राज्यकर्त्यांना शेतीविषयी आस्था नाही. कांदा पीकाला भाव द्यायचा असेल तर निर्यात केली पाहिजे. त्याच्या उलट पाऊल उचलले. मोदी सरकारने कांदा निर्यात बंद केली आहे. देशातले सर्वाधिक ऊस उत्पादन राज्यात होते पण ऊसाला भाव मिळत नाही. जे शेतकरी पिकवतात, शेतात घाम गाळतात त्यांच्या कष्टाला मोदी सरकार दाम देत नाही. म्हणजेच मोदी सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. असा घणाघात त्यांनी केला.
हा देश बळी राजाचा देश आहे..
हा देश बळी राजाचा देश आहे. आधी आपला देश गहू आयात करीत होता. तो आमच्या नेतृत्वात निर्यात करणारा देश बनवला. शेतकरी आत्महत्या करीत असल्याने आम्ही त्याच्या डोक्यावरील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. देशभर जवळपास ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. आमचे सरकार शेतकऱ्यांबद्दल संवेदनशील होते, असेही पवार म्हणाले.
..त्यांना त्यांची जागा दाखवून द्या!
शिंदखेडा तालुक्यात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. येथे एक प्रकारची गुंडगिरी सुरु आहे. हेमंत देशमुख सारखा नेत्याला तुरुंगात टाकण्याचे काम सरकारने केले आहे. खरे तर हा सत्तेचा गैरवापर आहे. कोणतेही सरकार हे लोकांच्या सेवेसाठी असते पण यांच्या डोक्यात सत्तेचा माज गेला आहे. यांच्याकडून सत्तेचा उन्माद दिसून येतो. या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम करा, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.