पुणे : पुणे शहरात झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. आता एकूण रुग्णांची संख्या ही 100 वर पोहोचली आहे. रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण अधिक असून, शहरात आतापर्यंत झिकाच्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात झिका व्हायरसचा वेगाने प्रसार होत असून रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता बाळगण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील डहाणूकर कॉलनी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झिकाचे सर्वाधिक 20 रुग्ण आहेत. त्या खालोखाल एरंडवणे क्षेत्रीय कार्यालयात 16 रुग्ण आहेत. खराडी 13, घोले रस्ता व पाषाण प्रत्येकी 9, सुखसागरनगर व मुंढवा प्रत्येकी 7, वानवडी 5, कळस 4, कोरेगाव पार्क व आंबेगाव बुद्रुक प्रत्येकी 3, लोहगाव 2, विश्रामबागवाडा आणि धनकवडी प्रत्येकी 1 अशी रुग्णसंख्या आहे. शहरातील एकूण 100 रुग्णांपैकी 45 गर्भवती आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.
शहरातील झिकाचा प्रादुर्भाव…
– एकूण रुग्णसंख्या – 100
– गर्भवती रुग्ण – 45
– रुग्ण मृत्यू – 5
झिका व्हायरसची लक्षणे…
• सौम्य ते उच्च ताप
• कन्जंक्टीव्हायटस (डोळे येणे)
• त्वचेवर पुरळ/ अॅलर्जी
• डोकेदुखी
• स्नायूदुखी व सांधेदुखी
• मळमळ व उलट्या होणे
• कधी-कधी शरीराच्या वरील व खालील भागामध्ये अशक्तपणा जाणवणे
काय करावे आणि काय करु नये…
झिकाचे निदान झाल्यानंतर व्यक्तींनी घरामध्येच राहावे. शक्यतो आराम करावा आणि भरपूर पाणी प्यावे. गरोदर महिलांनी विशेषत: संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या आसपास जाणे टाळावे. या आजावर कोणतेही वेगळे उपचार घेण्याची गरज नाही. तुम्ही स्वत: काळजी घेऊ शकता. झिका विषाणूपासून संसर्ग होण्याला प्रतिबंध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे डास चावण्याचा धोका कमी करणे. हे डास सामान्यत: दिवसा चावतात, ज्यामुळे तुमची राहण्याची जागा नेहमी स्वच्छ असण्याची आणि कुठेही पाणी साचणार नाही याची खात्री घ्या.