भिगवण : कर्मयोगी शंकरराव पाटील यांनी शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन कृषी, शैक्षणिक, सामाजिक, सहकार क्षेत्रामध्ये भरीव कार्य केले. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणाला दिशा देणारे नेतृत्व आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संदीप पालवे यांनी केले.
येथील इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालयांमध्ये शंकरराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मयोगी व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन बावडा येथील रत्नप्रभादेवी पाटील महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. लहु वावरे, इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पराग जाधव, महाविदयालय विकास समितीचे सदस्य संपत बंडगर, सुनिल वाघ उपस्थित होते.
डॉ. पालवे पुढे म्हणाले, कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या पुढाकारातुन उभारण्यात आलेल्या भिगवण महाविदयालयाने उजनी धरणग्रस्तांच्या जीवनांमध्ये शैक्षणिक व आर्थिक क्रांती घडवुन आणली आहे. त्यांच्या विचाराचा वारसा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील समर्थपणे चालवित आहेत ही समाधानाची बाब आहे.
‘महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कर्मयोगी शंकरराव पाटील यांचे योगदान याविषयावर बोलताना प्राचार्य डॉ. लहु वावरे म्हणाले, महाराष्ट्रातील कृषी, सहकार, आर्थिक, धवल व शैक्षणिक क्रांतीमध्ये कर्मयोगी शंकरराव पाटील यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे. असंघटित कामगार व धरणग्रस्तांचा प्रश्न सोडवुन त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज म्हणले, शंकरराव पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कर्मयोगी व्य़ाख्यानमालेच्या माध्यमातून युवकांपर्यंत कर्मयोगी शंकरराव पाटील यांचे कार्य पोहचावे हा या व्याख्यानमालेचा उद्देश आहे. प्रास्ताविक डॉ. प्रशांत चवरे यांनी केले, सुत्रसंचालन डॉ. बाळासाहेब खरात यांनी केले तर प्रा. दशरथ कुदळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी महाविदयालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.