लोणी काळभोर, (पुणे) : राजगुरूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्टल, मॅकझीनसह तब्बल ३० जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) पोलिसांनी रविवारी (ता. २०) ताब्यात घेतले आहे.
आकाश आण्णा भोकसे (वय- २३), महेश बाबाजी नलावडे (वय – २३) रा. दोघेही, कुरकुंडी ता. खेड) अवही ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ३ पिस्टल, ६ मॅकझीनसह तब्बल ३० जिवंत काडतुसे असा १ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खेड राजगुरुनगर या परिसरात गस्तीस होते. यावेळी पथकाला एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, दोन इसम काळया रंगाचे बुलेट गाडीवरून शिरोली बाजूकडून किवळे जात असून त्यांचेकडे गावठी बनावटीचे पिस्टल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी बुलेट गाडीवरील २ इसम दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव, पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे वरीलप्रमाणे सांगितली. दोघांच्या अंगाची झडती घेतली असता आकाश याचे कंबरेला खोचलेला दोन्ही बाजूस २ लोंखडी गावठी पिस्टल मॅकझीन, पॅन्टच्या खिशात २ मॅकजीन जिवंत काडतुसे सापडली. तर त्याचा मित्र महेश याच्याही कंबरेला १ गावठी पिस्टल मॅकझीनसह सापडले. तसेच पॅन्टच्या खिशात १ जिवंत काडतुसे भरलेली मॅकझीन मिळून आली.
दरम्यान, दोन्ही आरोपींकडून ३ गावठी पिस्टल आणि ३ मॅकझीन व ५ जिवंत काडतुसे, भरलेल्या पिस्टलमध्ये प्रत्येकी ५ जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच एक काळया रंगाची नंबर नसलेली बुलेट मोटारसायकल असा एकूण १ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींवर खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी खेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, गणेश जगदाळे, पोलीस हवालदार विक्रमसिंह तापकीर, विजय कांचन, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, धीरज जाधव, नीलेश सुपेकर, दगडू वीरकर यांचे पथकाने केली आहे.