मुंबई: दक्षिण मुंबई ते नवी मुंबई, पनवेल, मुंबई-गोवा महामार्ग गाठण्यासाठी रस्ते वाहतुकीदरम्यान लागणाऱ्या वेळेत आता बचत होणार आहे. लवकरच वाशी पुलाला समांतर असणारा दुसरा खाडी पूल सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. गणेशोत्सवानंतर या पुलाचे लोकार्पण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे मुंबई ते नवी मुंबई मार्गावरील प्रवास सुसाट होणार आहे. मुंबई बेट नवी मुंबईला जोडण्यासाठी वाशी पूल हा एकमेव पर्याय आहे. शहरांची वाढती लोकसंख्या, पोटापाण्यासाठी वाढणारी प्रवासाची वारंवारता यामुळे वाशी पुलासह महानगरीय सेवेवर ताण येत असल्याचे दिसून आले होते.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने २०२० रोजी ५५९ कोटी रुपये खर्च करून दुहेरी खाडी पुलाचा प्रस्ताव मांडला. हा नवा पूल १.८४ किमी लांबीचा आहे. नवा खाडी पूल १९९७ मध्ये पुन्हा बांधण्यात आला, तर जुना खाडी पूल १९७३ मध्ये बांधण्यात आला. मात्र, पुलाची संरचना कमकुवत झाल्याचे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये दिसून आल्याने तो पूर्णतः बंद करण्यात आला.
नवी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे पुलाच्या मार्गिका वाढवणे आवश्यक असल्याने नव्या पुलाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स भूमिगत मुंबई मेट्रो ३ प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येण्याची शक्यता असून, त्याचवेळेस या खाडी पुलाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. नवीन संरचना उघडल्यानंतर, एकूण मार्गिका ९ पर्यंत वाढतील, कारण प्रत्येक नवीन पुलाला ३ लेन आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्ये जेव्हा दक्षिणेकडे जाणारा कॅरेजवे कार्यान्वित होईल, तेव्हा मार्गिकची एकूण संख्या १२ होईल, म्हणजे प्रत्येक दिशेने ६ आणि वाहनचालकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.