संतोष पवार
पुणे : राज्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विविध थकीत बिलांसाठी जिल्हा परिषद, शिक्षण उपसंचालक कार्यालय, वेतन पथक विभागाकडे हेलपाटे मारावे लागत होते. शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सर्व प्रकारची थकित देयके शालार्थप्रणाली मधूनच अदा करण्यात यावीत याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. या शासन निर्णयानुसार वैद्यकीय बिले, थकीत बिले, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, न्यायालयीन आदेशान्वये असणारे देय असलेली फरकबिले शालार्थप्रणालीमधून ऑनलाइन पद्धतीने मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळ संघटनाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी खांडेकर म्हणाले की, शालार्थ प्रणाली निर्माण झाल्यापासून शिक्षण विभागात असणारी अनेक बिले ऑफलाइन पद्धतीने दिली जात होती. नोव्हेंबर २०१६ पासून सदरची बिले शालार्थ प्रणालीमधून देण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. यासंबंधी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. शासनाच्या नव्या धोरणानुसार थकीत बिलाकरिता विहित कागदपत्रे शालार्थ प्रणालीत अपलोड करावीत. त्यानुसार पडताळणी करून शिक्षण विभागाने ऑनलाइन पद्धतीने बिल अदा करावे. या अनुषंगाने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
३ सप्टेंबर २०२४ रोजी थकीत देयके ऑनलाइन पद्धतीने शालार्थमध्ये सादर करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. असे या बैठकीमध्ये निर्देश देण्यात आले. याबाबतीत ११ सप्टेंबर रोजी शिक्षण संचालनालयाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. शालार्थ प्रणाली मधील ऑनलाईन बिले सादर करण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तरी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शालार्थ प्रणालीमधूनच आपली थकित बिले सादर करावीत. या बिलांची तपासणी व पडताळणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर उचित असा निर्णय घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
त्याचबरोबर जिल्हा बाहेरील बदली मान्यतामुळे पगार बिले होण्यास विलंब होत होता, या विलंबामुळे थकीत बिले ऑफलाइन पद्धतीने सादर करावी लागत होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपली बिले मिळण्यास विलंब लागत होता. अद्यापही अनेक प्रकारची थकित बिलेही प्रलंबितच आहेत. सदरच्या आदेशामुळे शिक्षक शिक्षकेत्तर बांधवांची आता या साऱ्या प्रश्नांतुन सुटका होणार आहे.
या शासननिर्णयामुळे शिक्षणक्षेत्रात आनंद व समाधान व्यक्त केले जात आहे. शिक्षण हमी कायद्याचेही पालन करून निर्धारीत वेळेतच काम करण्याचे बंधन संबंधितांना राहणार आहे. पारदर्शकपणे सुसूत्रता व क्रमवारीप्रमाणे बिले अदा होण्यास मदत होणार आहे. सदरच्या निर्णयामुळे ऑनलाईन पद्धतीने थकित देयके मिळणार असल्याने शिक्षकेत्तर लिपिक बांधवांच्या कामकाजामध्ये सुसूत्रता येऊन वेळेचीही बचत होण्यास मदत मिळणार आहे. राज्य शिक्षकेत्तर महामंडळाच्या वतीने शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे .