लोणी काळभोर : अंमली पदार्थाची खुलेआम विक्री करणाऱ्या दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक २ च्या पोलिसांकडून लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात करण्यात आली. सुमेर सादीक तांबोळी (वय 26 , रा. जयभवानी चौक, बुरडगल्ली, ता. सांगोला, जि. सोलापुर) व विकास बाळु बनसोडे, (वय 34 , रा.सांगोला, सोलापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 30 किलो 870 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. २ चे पोलिस लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, लोणी काळभोर येथील शेल पेट्रोल पंपाजवळ असलेल्या रस्त्यावर दोन इसम सार्वजनिक ठिकाणी खुलेआम गांजा या अंमली पदार्थाची विक्री करीत आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून आरोपी सुमेर तांबोळी व विकास बनसोडे याला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या. आरोपींकडे असलेल्या दोन्ही गोण्यांची तपासणी केली असता, दोन्ही गोण्यांमध्ये सुमारे 38 किलो 870 ग्रॅम गांजा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, आरोपी सुमेर तांबोळी व विकास बनसोडे यांच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
ही कामगिरी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक २ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार युवराज कांबळे, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदिप जाधव, साहिल शेख, अझिम शेख, आझाद पाटील व दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली आहे.