दिनेश सोनवणे
दौंड : दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाभाई शेख यांच्यासह २० जणांवर ॲट्रॉसिटी प्रकरण हे सध्या जिल्ह्यात गाजत असून याच प्रकरणातील तब्बल १० दिवसांपासून पोलिसांचा चकवा देणाऱ्या ३ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लोणावळ्यातून अटक केली आहे.
वाहिद जावेद खान (वय-२१) जुम्मा उर्फ सुफियान रमजान शेख (वय-२०) आणि इलियास इस्माईल शेख (वय-३१, सर्व रा. कुंभार गल्ली दौंड, जिल्हा पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या प्रकरणी एका पिडीत तरुणीने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा विनयभंग करून कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाभाई शेख यांच्यासह २० जणांवर ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दौंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाले होते.
या घडलेल्या घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आरोपीचा शोध घेऊन, तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्या होत्या.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पथकाला, आरोपी लोणावळा येथे रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचून तिन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने पकडले. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी दौंड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उप निरीक्षक सिद पाटील, पोलीस हवालदार सचिन घाडगे, असिफ शेख, अजित भुजबळ,अजय घुले, आणि मुकुंद कदम यांच्या पथकाने केली आहे.