पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गणरायाच्या आगमनापासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसांत राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर काही भागात पावसाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
राज्यात काही भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला. तर, उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य भारतावरील कमी दाबाचे क्षेत्र ओसरल्याने राज्यातील पावसाची तीव्रता कमी होईल. आज पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस दक्षिण कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात सरी बरसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, धुळ्यामध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.