विशाल कदम
लोणी काळभोर : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग तब्बल १९ वर्षानंतर मोकळा झाला आहे. या निवडणुकीत परिस्थितीची पडताळणी करून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निर्णय घ्यावा. असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे गुरुवारी (ता.१७) दिले आहेत.
शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. तर आता या आदेशामुळे सर्व शेतकऱ्यांचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन लोकनियुक्त संचालक मंडळ २९ जुलै २००३ रोजीच्या आदेशान्वये जिल्हा उपनिबंधकांनी बरखास्त केले होते. त्यानंतर तब्बल १९ वर्षे समितीवर कधी प्रशासक व राज्य सरकारातील पक्षांना सोईचे प्रशासकीय मंडळ होते.
परंतु, प्रशांत काळभोर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन, शेतकऱ्यांना तत्काळ न्याय मिळावा. यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यासंदर्भात शासन व इतरांविरुद्ध याचिका दाखल (१२२५४/२०२२) केली होती.
त्यानंतर हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्याबाबत कोणतीही स्थगिती नसल्याचे बाजार समितीच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास १४ नोव्हेंबर २०२२ रोजी कळविले आहे.
त्याचा संदर्भ देत उच्च न्यायालयाने निवडणूक प्राधिकरण परिस्थितीची पडताळणी करेल आणि निवडणूक आयोजित करण्याबाबत किंवा पुढील निर्णय घेईल, असे आदेश गुरुवारी (ता.१७) दिले आहेत. हे आदेश न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला आणि एस. जी. दिघे यांच्या खंडपीठाने दिले आहेत.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे हवेली बाजार समितीच्या निवडणुकीबाबत येत्या सोमवारी (ता.२१) पुढील कार्यवाही अपेक्षित असून, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण कोणता निर्णय घेणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या संदर्भातील पुढील सुनावणी २१ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ ॲड. व्ही. पी. सावंत आणि अॅड. अभिजित कदम यांनी काम पाहिले.
याबाबत बोलताना शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर म्हणाले कि, पुणे बाजार समिती हि देशातील पहिली बाजार समिती असेल कि, जिच्यावर मागील तब्बल १९ वर्षापासून प्रशासक आहे. बाजार समितीचे नामकरण करून हवेली, मांजरी, पुणे जिल्हा, पुणे समितीत मुळशीचे एकत्रीकरण नंतर विभाजन करून स्वतंत्र बाजार समिती करून सातत्याने निवडणुका लांबविण्यात धन्यता मानली.
आणि समितीवर केवळ प्रशासक, प्रशासकीय मंडळांद्वारे काम सुरु ठेवले होते. परंतु, आता उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे हवेली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. व याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.
जिल्ह्यातील ९ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मतदार याद्या जाहीर :
पुणे जिल्ह्यातील ९ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केलेल्या आहेत. त्यामध्ये पुरंदर, भोर, दौंड, आंबेगाव, खेड, शिरूर, इंदापूर, बारामती व जुन्नर बाजार समितीचा समावेश आहे. त्यानंतर आता मावळ बाजार समितीची प्रारूप यादी जाहीर होण्याची अपेक्षा आहे.