छत्रपती संभाजीनगर: वीज पडून, पुरात वाहून जाणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे १ जून ते ६ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यात ५३ जणांचा मृत्यू झाला. तर १ हजार २६९ जनावरे दगावले असून पावणे तीन हजार कच्चा व पक्क्या घरांची पडझड झाल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. मराठवाड्यात यावर्षी चांगला पाऊस पडत आहे. काहीवेळा मुसळधार तर काही वेळा मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसला आहे. या काळात वीज पडून, पुरात वाहून गेल्याने आदी नैसर्गिक आपत्तीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ जणांचा मृत्यू तर ३ जण जखमी झालेत. तर जालन्यात ५ जणांचा मृत्यू तर ६ जण जखमी झालेत. परभणीत ८ जणांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या १ आहे. हिंगोलीत ५, तर नांदेड जिल्ह्यात ९ जणांचा मृत्यू झाला असून बीड जिल्ह्यात ६ व्यक्ती दगावले तर १ जण जखमी झाला. लातूरात मयताची संख्या ९ असून जखमी ४ जण आहेत. तसेच धाराशिव जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला तर एक जखमी आहे.
यासह विभागात छोटी मोठी मिळून १ हजार २६९ जनावरे दगावले. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४७, जालना १८५, परभणी ३८५, हिंगोली २३२, नांदेड १२०, बीड ९९, लातूर ९७ व धाराशिव जिल्ह्यातील १०४ जनावरे दगावले.
घरांची पडझड
विभागात पक्के व कच्चे मिळून पावणे तीन हजार घरांची पडझड झाली. यात पूर्णपणे पडझड झालेल्या घरांची संख्या १४ आहे. तर अंशतः पडझड झालेल्या पक्क्या घरांची संख्या ३८४ तर अंशतः झालेल्या कच्च्या घरांची पडझड झालेल्या घरांची संख्या २ हजार ४२३ एवढी आहे. सर्वाधिक म्हणजे १ हजार २६० घरांची पडझड एकट्या हिंगोली जिल्ह्यात झाली. तर पडझड झालेल्या झोपड्याची संख्या २७ तर बाधित गोठ्याची संख्या १८२ एवढी आहे.