बारामती: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक प्रवीण युवराज कांबळे यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. घरगुती अडचणीमुळे राजीनामा दिला, असे त्यांनी राजीनाम्यात सांगितले. कांबळे यांचा अजून दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक असताना कारखान्याकडे राजीनामा सादर केला आहे. कारखान्याशी संबंधित गैरवर्तन केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ताबडतोब दखल घेऊन राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पवार यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील सर्व संस्थांमधील संचालकांवर अंकुश निर्माण होणार आहे. सोमेश्वर कारखान्याच्या होळ गटामधून प्रवीण कांबळे हे अनुसूचित प्रवर्गातून ऑक्टोबर २०१९ मध्ये निवडून आले होते. तीन वर्षे पूर्ण होण्यास काही अवधी असताना आणि दोन वर्षाचा कालावधी पूर्ण करण्याआधीच कांबळे यांना पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात या संचालकाबाबत चर्चाना उधाण आले आहे.
दरम्यान, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, अजित पवार यांना कारखान्यासंदर्भात काही चुकीच्या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ताबडतोब दखल घेऊन राजीनामा देण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार कांबळे यांनी आज सायंकाळी राजीनामा दिला. येथून पुढे कारखान्यासंदर्भात संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्या काही चुकीची गोष्टी निदर्शनास आल्यास त्यांच्यावर योग्य तो कारवाई केली जाईल.