पुणे : राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झालेला दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले असून त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेकांच्या शेतातील हाता तोंडाशी आलेला भात पीक आणि इतर पिके जमीनदोस्त झाली आहेत. हवामान विभागाने आजही विदर्भातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
‘या’ भागात पावसाची शक्यता..
आज (ता. ११) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, पूर्व विदर्भातील अमरावती, नागपूर जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उद्यापासून (ता. १२) राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.