गोरख जाधव
डोर्लेवाडी, (पुणे) : सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. पावसाच्या या अनियमिततेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. सर्दी, ताप, आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. खासगी रुग्णालयांत ताप, मळमळ, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी व उलटीसारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने डोर्लेवाडी, झारगडवाडी, सोनगाव, या परिसरात डेंगू, चिकुनगुण्या, गोचीडताप या सारखे आजार बळावले आहेत. त्यामुळे सर्व ग्रामस्थ धास्तवलेले आहेत.
दिवसा उन्हाळा तर सायंकाळी हिवाळ्यासारख्या शीतलहरी शरीराला झोंबत असल्याने याचा सर्व परिणाम हा लहानांपासून तर वृद्धांपर्यंत अनेकांना होत असून संसर्गजन्य आजाराने डोकेवर काढल्याचे चित्र सध्या डोर्लेवाडीसह परिसरात आहे. ग्रामीण भागात ‘व्हायरल इन्फेक्शन’ निरनिराळ्या साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने खासगी रुग्णालयाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
डोर्लेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने धुरळा फवारणीला सुरुवात करण्यात आली असून हवामानातील बदल आणि त्यातच रिपरिप पावसामुळे काही दिवसांपासून ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. सध्या खाजगी वैद्यकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांचा ओघ जास्त आहे. रोज दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी अधिक रुग्ण साथीच्या आजारांचे आहेत. रुग्णालयामध्ये बाह्यरुग्ण विभागात बहुसंख्य रुग्ण तपासणीसाठी येत आहेत.
यामध्ये अनेक रुग्ण साथीच्या आजाराने त्रस्त असल्यामुळे उपचारासाठी येत आहेत. वातावरणात सध्या कमालीचा बदल झाला आहे. कधी पाऊस, तर कधी ऊन पडत असल्यामुळे संसर्गजन्य आजारांत वाढ झाली आहे. या वातावरणामुळे सध्या डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. वयोवृद्ध तसेच लहान मुलांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक धोका त्यांना आहे.
हर घर सर्दी, खोकला तापाचे रुग्ण!
बदलत्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढत्यामुळे रुग्णालयांमध्ये तापासह थंडी, सर्दी, खोकला, मळमळ, उलटी, अंग तसेच डोकेदुखीचे विकार असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
या कराव्यात उपाययोजना
- पाणी साठवण टाळणे आणि साठलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे.
- घरी आणि आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखणे.
- मच्छरदानीचा वापर करणे आणि मच्छरांपासून संरक्षण मिळण्यासाठी इतर उपाययोजना करणे.
- ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे.
- घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका.
- त्वचेवर आणि कपड्यांवर मच्छर प्रतिरोधक क्रीम लावा.
- शरीराचा जास्तीत जास्त भाग झाकणारे कपडे परिधान करा.
- ताप, डोकेदुखी, सांधेदुखी किंवा त्वचेवर लाल चकत्या आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लहान मुलांपासून ते जेष्ठापर्यंतच्या रुग्णांचा यात समावेश आहे. ताप आल्यानंतर तातडीने आपल्या डॉक्टरांना दाखविणे उचित ठरते. परंतू काही जण स्वतः औषधी घेवून दुखने अंगावर काढतात. तसे न करता डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच औषधी घेणे आवश्यक आहे.
डॉ.विजय देवकाते आणि डॉ.प्रमोद नवले
“हवामानातील बदलामुळे साथीचे व संसर्गजन्य आजार वाढते आहेत. ते लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घेणे अपेक्षित आहे. बाहेरचे खाणे-पिणे टाळावे. तसेच पाणीदेखील उकळून घ्यावे. प्राथमिक आरोग्य केंद्रात साथीच्या आजारांवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे.” बाहेर उपचार घेण्या पेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व रुग्णांनी उपचार घ्यावेत.
डॉ. रेश्मा पाटील , प्रथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडी