पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांसह पोलीस देखील असुरक्षित आहेत. अशातच आता दारू पिऊन रस्त्यात गोंधळ घालणाऱ्या संगणक अभियंत्याला समज देण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी संगणक अभियंत्यासह त्याच्या भावाला वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याप्रकरणी नयन शिवाजी भंडलकर (वय २५) आणि आशिष शिवाजी भंडलकर (वय २२, दोघे रा. कुंदन इटर्निया, बी. टी. कवडे रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी भंडलकर यांच्याबरोबर असलेल्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी अनिकेत वाबळे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयन भंडलकर संगणक अभियंता आहे. त्याचा भाऊ आशिष शिक्षण घेत आहे. सोमवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर रोझरी सोसायटीच्यासमोर काहीजण दारू पिऊन गोंधळ घालत आहेत, अशी माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला (पोलीस कंट्रोल) दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी वाबळे आणि सहकाऱ्यांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी भंडलकर भररस्त्यात आरडाओरडा करत होता. पोलीस कर्मचारी बावळे आणि सहकाऱ्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
मात्र, भंडलकर आणि त्याच्याबरोबर असलेल्या भावाने वाबळे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करून भंडलकरबरोबर असलेले तीन मित्र पसार झाले. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भंडलकर आणि त्याच्या भावाला अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी दिली आहे.