पुणे : पुण्यातील वाघोली परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे पाण्याच्या टाकीत बुडून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी एकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेखा मुकेशसिंग चौहान (वय-६) असं पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना शनिवारी घडली आहे.
याबाबत मुकेशसिंग चौहान (वय २९, रा. खांदवेनगर, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रमेश बालाजी मुंडे (वय ४०, रा. कवडे वस्ती, वाघोली ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील कवडे वस्ती परिसरात मुंडे याची तीन मजली इमारत आहे. इमारतीचे बांधकाम अर्धवट केले असून तेथे असलेल्या पाण्याच्या टाकीला झाकण नाही. सुरक्षेच्या दृष्टीने पाण्याच्या टाकीला झाकण बसवणे गरजेचे होते. मुकेशसिंग याची सहा वर्षांची मुलगी रेखा अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीतील टाकीजवळ गेली. टाकीत ती तोल जाऊन पडल्याची घटना शनिवारी घडली आहे.
टाकीत बुडालेली रेखा घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. तेव्हा ती टाकीत पडल्याची आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. इमारत मालक मुंडे याच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर मुंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खटके करत आहेत.