पुरंदर : सासवड ते उरुळी कांचन बससेवा बंद केल्याने नागरिकांचे प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामध्ये विद्यार्थी, कामगार, व्यवसायिक यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सासवड ते उरुळी कांचन बससेवा पुन्हा सुरु करा, असे निवेदन गुऱ्हाळे ग्रामस्थ असलेले संदीप खेडेकर यांनी पीएमपीएमएल व्यवस्थापक, पुणे यांच्याकडे दिले आहे.
संदीप खेडेकर यांनी पीएमपीएमएल व्यवस्थापनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सासवड ते उरुळी कांचन बससेवा मागील काही दिवसांपासून आपल्या पीएमपीएमएल कार्यालयाने बंद केली आहे. त्यामुळे सदर बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी हे सकाळी ७.२० वाजता एम.आय. टी इंजिनियरिंग कॉलेज व इतर खाजगी शिक्षणसंस्था मध्ये जाणारे शाळकरी, नेहमी ये-जा करणारे कामगार, व्यावसायिक यांची गैरसोय होत आहे.
तरी परिसरातील सर्व खेडेगावांमध्ये नाराजी आहे. सर्वांना मिळेल त्या खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. तसेच पाचनंतर पुन्हा येण्यासाठी बसची सोय नसल्यामुळे संध्याकाळी वेळेवर घरी पोहचत नाही. हा सर्व प्रवास धोकादायक झाला आहे. तरी सदर परिस्थीचा विचार करून सासवड ते उरुळी कांचन सेवा पुन्हा सुरु करावी असे निवेदन देण्यात आले आहे.