सासवड : भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत पुरंदर तालुक्यातील सोनोरी ग्रामपंचायतला जिल्हास्तरीय दुसरा व चांबळी ग्रामपंचायतला जिल्हास्तरीय तिसरा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर बारामती तालुक्यातील करहाटी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय पहिला व राज्यस्तरीय देखील पहिला असे दीड कोटीचं पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नाशिक येथे भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा २०२२-२३ चे निकाल आज 9 सप्टेंबर रोजी जाहीर झाले आहेत.
राज्यातून प्रथम क्रमांकाचा १ कोटी रुपये आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा ५० लाख रुपये असे दोन्ही पुरस्कार काऱ्हाटी ग्रामपंचायतीला जाहीर करण्यात आले आहेत. पुरंदर तालुक्यातील सोनोरी ग्रामपंचायतला जिल्हास्तरीय दुसरे रुपये 30 लाख व चाबळी ग्रामपंचायतला जिल्हास्तरीय तिसरे 20 लाख रुपये असे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे, फलोत्पादन मंत्री नरहरी झीरवाळ तसेच प्रधान सचिव संजय खंदारे, आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा दिवाकर धोटे यांचे मार्गदर्शनानुसार, सहाय्यक भूवैज्ञानिक सुजाता सावळे व सहाय्यक भूवैज्ञानिक संतोष गावडे यांच्या नियोजनानुसार पुणे जिल्ह्यात भूजल ग्राम समृद्ध स्पर्धा राबविण्यात आली होती.
तसेच उप विभागीय अधिकारी बारामती वैभव नावडकर व उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रशासनाने केलेल्या कामाची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली आहे. भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित गुणवत्ता थांबवण्याकरीता मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अमंलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सशक्त करण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बॅंक अर्थसहाय्यित अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे.
लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे हा योजनेचा गाभा आहे. त्याकरीता ग्रामस्तरावर जलअंदाजपत्रक तयार करणे, भूजल उपलब्धतेतील तूट भरुन काढण्यासाठी अस्तित्वातील राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अधिकाधिक अभिसरण करणे व ग्रामस्तरावरील भूजल उपलब्धतेत शाश्वतता साध्य करणे, हे योजनेचे उद्दिष्ट आहे. अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने गावा-गावांमध्ये सुदृढ स्पर्धा निर्माण व्हावी व योजनेचे मुख्य उद्दीष्ट ‘लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते