पुणे: पुणे महापालिकेच्या प्रक्रिया प्रकल्पातून निघालेले आरडीएफ, खत आणि रिजेक्ट कोठे टाकण्यात येते, याची इत्थंभूत माहिती ठेवण्यासाठी हे वाहून नेणाऱ्या प्रत्येक वाहनाला जीपीएस सिस्टिम वसविण्यात येणार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी दिली.
महापालिकेच्ण रामटेकडी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पातून दौंड तालुक्यातील देऊळगाव वाडा या गावातील एका स्टील कंपनीच्या बॉयलरसाठी प्लास्टिकचा कचरा आणि चिंध्या घेऊन निघालेला ट्रक ग्रामस्थांनी पकडून यवत पोलिसांच्या स्वाधीन केला होता. राज्य प्रदूषण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून प्लास्टिकच्या कचऱ्याची अशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन चालकावर गुन्हा दाखल केला. २८ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेनंतर महापालिकेच्या वतीने रामटेकडी परिसरातील सर्वच कचरा प्रक्रिया प्रकल्पांना ट्रकबाबत विचारणा करणारी नोटीस बजावली आहे. परंतु, अद्यापही हा ट्रक कोणत्या प्रकल्पातून गेला आहे, याची माहिती उपलब्ध झालेली नाही, अशी माहिती संदीप कदम यांनी दिली.
उरुळी कचरा डेपोतील बायोमायनिंग प्रक्रियेच्या निविदेत महुआच्या गाइडलाइननुसार शहरातून गोळा झालेला आणि प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत जाणाऱ्या कचऱ्याचे ट्रॅकिंग करण्यासाठी कचरा वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाला जीपीएस सिस्टिम अनिवार्य केले आहे. परंतु, प्रथमच बायोमायनिंगच्या निविदेत प्रक्रिया झाल्यानंतर तयार होणारे आरडीएफ, खत आणि रिजेक्टची अंतिम विल्हेवाट एमपीसीबीच्या गाइडलाइननुसार होते की नाही? यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही वाहतूक करणाऱ्या वाहनांनादेखील जीपीएस सिस्टिम अनिवार्य केली आहे.