पुणे : पुण्यात एक पिकअप चालकाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत 4 ते 5 वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळत आहे. ही घटना रविवारी (08 सप्टेंबर) रात्री 11 वाजता ही घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला मनसे (MNS) पदाधिकाऱ्याची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे.
या भीषण अपघातात श्रीकांत अमराळे आणि गीतांजली अमराळे या दाम्पत्याला चिरडले.
मिळालेल्या माहितीनुसार, कोथरुड परिसरातील करिश्मा चौकात हा भीषण अपघात घडला आहे. चालक आशिष पवार हा दारुच्या नशेत करिश्मा चौकातील गाड्यांना धडक देत जात होता. त्यावेळी तो करिश्मा चौकातील सिग्नलजवळ आला तेव्हा त्याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे आणि त्यांची पत्नी गीतांजली अमराळे उभे होते. आशिष पवारने दारुच्या नशेत टेम्पो त्यांच्या अंगावर घातला. यामध्ये गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन वाहन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.
या चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी पिकअप चालकाला पकडलं आणि बेदम चोप दिला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.