पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना समोर आली आहे. मुळशी तालुक्यातल्या पौड परिसरात एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या तीन शाळकरी मुलांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शाळकरी मुले गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे.
कार्तिक रामेश्वर मावकर इयत्ता ८ वी (वय १४), सम्यक प्रमोद चव्हाण इयत्ता ८वी (वय १४) आणि प्रेम साहेबराव चव्हाण इयत्ता ७वी (वय १३) (सर्व रा. अकोले ता. मुळशी) अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. यातील एका विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक, सम्यक आणि प्रेम ही तीन मुले पौड येथील मामासाहेब मोहोळ विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत. काल शनिवारी (दि. ०७) सायंकाळच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर हे तिघेही रस्त्याच्या बाजूने घराच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी रस्त्यावरून येणारी भरधाव कार दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करत असताना कार चालकाने रस्त्याच्या कडेने चालणारे या तिघांना जोरदार धडक दिली. कार भरधाववेगात असल्याने हे तीनही विद्यार्थी हवेत उडून रस्त्यावर पडले. या घटनेनंतर कार चालक घटनास्थळावर न थांबता त्याने तिथून पळ काढला.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या तीनही विद्यार्थ्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील एका विद्यार्थ्यावर रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पौड पोलीस कार चालकाचा शोध घेत आहे.