पुणे : तळेगाव येथील कुंडमळा परिसरात एक तरुण व तरुणी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि घटना ५ सप्टेंबर रोजी कुंडमळा येथे घडली होती. श्रेया सुरेश गावडे (वय-17, रा. चिंचवड गाव), रोहन ज्ञानेश्वर ढोंबरे (वय-22, रा. चिंचवडगाव) अशी वाहून गेलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रेया आणि रोहन हे दोघेजण कुंडमळा येथे फिरण्यासाठी गेले होते. श्रेया सेल्फी घेत असताना स्वतःचा तोल सावरत पाण्यात पडली. दरम्यान, तिला वाचवण्यासाठी रोहनने पाण्यात उडी घेतली. मात्र, तो श्रेयाला वाचवण्यास अपयशी ठरला. दोघेजण पाण्यात वाहून गेले. त्यातील तरुणाचा मृतदेह गुरुवारी दुपारी सापडला होता. तर तरुणी बेपत्ता झाली होती. तरुणीच्या शोधासाठी शुक्रवारी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. अखेर मुलीचा मृतदेह आज (दि. ७) हाती लागला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस दाखल झाले आहेत. गुरुवारी दुपारी रोहन याचा मृतदेह काढण्यात शोध मोहीम पथकाला यश आले. त्यानंतर पुन्हा दोन दिवस शोध मोहीम राबवून तरुणीचा देखील मृतदेह शोधण्यात पथकाला आज यश आले आहे.
वन्यजिव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळ्याचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, भास्कर माळी, विनय सावंत, गणेश गायकवाड, राजेंद्र बांडगे, रवी कोळी, शुभम काकडे, सत्यम सावंत, अनिश गराडे, राजु सय्यद, कमल परदेशी तसेच तळेगाव दाभाडे अग्निशमन दलाच्या जवानांनी यासाठी लाखमोलाचे परिश्रम घेतले आहेत.