मुंबई: शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे कार्यादेश दिल्यानंतर अवघ्या दीड वर्षात ३ मेगावॅटच्या पहिल्या सौरऊर्जा प्रकल्पातून १७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात आला आहे. गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम महावितरणने साधले आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे कार्यान्वित करण्यात झाला. या प्रकल्पामुळे १७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येत असून सौरऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करायची व त्याच्या आधारे कृषी पंप चालवायचे अशी ही योजना आहे.
हा जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. धोंदलगाव प्रकल्प ही सुरुवात आहे. या वर्षी मार्चमध्ये प्रदान केलेल्या ९२०० मेगावॅट विकेंद्रित सौर प्रकल्पांचा हा एक भाग आहे. प्रकल्पांतर्गत संपूर्ण क्षमता डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी राज्यात तीस टक्के कृषी कृषी फीडर्स डिसेंबर २०२५ पर्यंत सौरऊर्जेवर चालवण्यासाठी मिशन २०२५ जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे.