संदीप बोडके
हडपसर : ‘पुणे प्राईम न्यूज’च्या बातमीने हडपसर तलाठी कार्यालयातील भोंगळ कारभाराला चांगलाच दणका दिला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित तलाठ्याची योग्य झाडाझडती घेतल्याने हडपसर तलाठी कार्यालय काहीअंशी जागे झाले आहे. हडपसरचे तलाठी स्वरुप पवार यांनी “मला वाटलं व्हतं, तुम्ही याल” या आशेनं बँक बोजाच्या तीन महिन्यांहून अधिक वेळ झुलवत ठेवलेल्या फेरफार नोंदी ‘पुणे प्राईम न्यूज’च्या बातमीने अखेर मार्गस्थ झाल्या आहेत.
हडपसर तलाठी कार्यालयाला “टेक्निकल प्रॉब्लेम”ची लागण झाल्याने दफ्तरातील अनेक फेरफार नोंदी “प्रलंबित”च्या बेडवर आरामशीर पडलेल्या होत्या. यामध्ये तलाठी महोदयाच्या महसूल वसुलीतील चाणाक्ष नजरेतून बँक बोजाच्या फेरफार नोंदी देखील सुटू शकलेल्या नव्हत्या. “पुणे प्राईम न्यूज” ने याची दखल घेत हडपसर तलाठी कार्यालयाचा कारभार जनता व प्रशासनासमोर मांडला होता.
“हडपसरमधील शेकडो फेरफार प्रोटोकॉलसाठी तलाठीनिर्मित प्रलंबितच्या सापळ्यात अडकले; तलाठ्याच्या कारभाराने शासकीय योजना बदनाम ” या मथळ्याखाली ‘पुणे प्राईम न्यूज’ ने बातमी प्रकाशित केली होती. यामुळे झोपेचं सोंग घेतलेले प्रशासन खडबडून जागे झाले. त्यामुळे हडपसरच्या तलाठी कार्यालयाला झालेल्या नवनिर्मित व्हायरसचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला आहे.
हडपसर येथील बँक बोजा फेरफार क्रमांक ५४४१४ व ५४४२४ हे फेरफार तलाठ्याने २० मे रोजी गावी दफ्तरी घेतले होते. मात्र, “मला वाटलं व्हतं, तुम्ही याल” या नेहमीच्या स्टाईलने तलाठ्याने तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ घेत अनेक फेरफार नोंदी प्रलंबित ठेवलेल्या होत्या.
तलाठ्याच्या कारभाराने कर्जदारांना तीन महिने उशिराने कर्ज
रजिस्टर गहाणखत दस्त नोंदवल्यानतंर आणि त्याचा फेरफार झाल्यानंतर सातबारावर बोजा दाखल झाल्यावरच कर्जदाराला कर्जाची रक्कम मिळत असते. परंतु, हडपसरचे तलाठी स्वरुप पवार यांच्या प्रोटोकॉलच्या कारभाराने कर्जदारांना बँक बोजा फेरफार व सातबारासाठी तीन महिने ताटकळत ठेवल्याचा गंभीर प्रकार यानिमित्ताने उघड झाला आहे.