मुंबई : हिट अँड रनच्या घटना एकामागून एक घडत आहेत. अशातच आता हिट अँड रनच्या घटनेनं पुन्हा एकदा मुंबई हादरून गेली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीच गणेशोत्सव मंडळाचे बॅनर लावणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना चिरडले. मुलुंडमध्ये पहाटेच्या सुमारास एका आलीशान कारने दोघांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी आहे. दोघे तरुण रस्त्यावर गणेशोत्सव मंडळाचे बॅनर लावत असतानाच दोघांना कारने जोरदार धडक दिली आहे.
मुंबईत पहाटे घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेनं शोककळा पसरली आहे. मुंलुंडमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशीच पहाटे हिट अँड रनची घटना घडल्यामुळे संपूर्ण मुंबईला पुन्हा एकदा हादरा बसला आहे. या घटनेत गणेशोत्सव मंडळाच्या एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे तर एकाची प्रकृती गंभीर आहे. कार्यकर्त्यांना उडवल्यानंतर चालक तिथून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे.
एकाचा मृत्यू तर एक गंभीर..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंडमध्ये पहाटे चार वाजता एका बीएमडबल्यू कारनं रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आणि बीएमडबल्यू कार चालक पसार झाला आहे. यात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवरजवळ रस्त्यावर शिडी लावून बॅनर लावत होते.
अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात होती. या दोघांना शिडीसह जोरदार धडक दिली. धडक देऊन हा चालक थांबला सुद्धा नाही, मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगानं पळून गेला. यात प्रीतम थोरात याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून कारचा आणि चालकाचा शोध सुरू आहे.