पिंपरी : पिंपरी शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावाकडील महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याने पत्नीचा मानसिक आणि शारीरीक छळ केला. ती गर्भवती असल्याचे समजल्यावर तिचा गर्भपात करण्यासाठी गोळ्या खाण्यास दिल्या. त्यातून अति रक्तस्त्राव होऊन विवाहितेचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ही घटना खेड तालुक्यातील मोई गावात ५ सप्टेबर रोजी घडली आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
शिवराज मन्नाप्पा राठोड (वय-३१, रा. सोनापुरता तांडा, ता. सोरापूर, जि. यादगीर, कर्नाटक) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत सचिन धर्मानायक चव्हाण (वय-२१, रा. बैलापुरतांडा, ता. सोरापूर, जि. यादगीर, कर्नाटक) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचे आणि शिवराज राठोडचे २०२१ मध्ये विवाह झाला होता. शिवराज याचे गावाकडील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून तो फिर्यादीच्या बहिणीस कोणत्या ना कोणत्या कारणावरुन शिवीगाळ करुन उपाशी पोटी ठेवत असे. माहेरहून खर्चासाठी पैसे व सोने घेऊन ये, असा तगादा लावून तिचा शारीरीक व मानसिक छळ करायचा.
दरम्यान, कर्नाटकातील गावाहून ते खेड तालुक्यातील मोई गावी राहण्यास आले. फिर्यादी यांची बहिण दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे त्याला समजले. तेव्हा त्याने गर्भपात करण्याच्या उद्देशाने तिला गर्भस्त्राव होण्याच्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यातून तिला अति रक्तस्त्राव होऊन तिचा दुर्दैवी मृत्य झाला. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायभाये करत आहेत.