पुणे : पुणे शहरात गुन्हेगारांनी थैमान घातले आहे. शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असून, आपआपल्या परिसरात दहशत निर्माण केली जात आहे. अशातच आता येरवड्यामध्ये जुन्या वादातून एका चायनीज हॉटेल चालकावर तलवारीने हल्ला करण्यात आला असून, जबरदस्तीने हॉटेलच्या गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.
हि घटना २ सप्टेंबर रोजी साडेआठच्या सुमारास येरवडा इराणी मार्केट जवळ पक्को चायनीज हॉटेल येथे घडली आहे. असिम जावेद सय्यद असे जखमी झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी जावेद अहमद सय्यद (वय-५६, रा. गोल्फ क्लब रोड, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोबीन शेख आणि त्याच्या साथीदारांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद सय्यद आणि ओरीपी यांच्यात रमझान महिन्यामध्ये वाद झाला होता. याचा राग आरोपी मोबीन याच्या मनात होता. दरम्यान, मोबीन हा सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास जावेद यांचा मुलगा असिम हा हॉटेलमध्ये असताना आला होता. त्याने असिमच्या अंगावर तलवारीने वार केला. यामध्ये असिमच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेत हॉटेल चालक गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, तलवारीचा हल्ला झाल्यानंतर दोन्ही आरोपींनी गल्ल्यातील रोख रक्कम ६ ते ७ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आणि घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर देखील या आरोपींनी फोनद्वारे शिवीगाळ करत जावेद यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास सहायक निरीक्षक खेडकर करीत आहेत.