पिंपरी : पिंपरी शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. क्षुल्लक कारणावरून कोयत्याने मारहाण, तसेच लोखंडी गजाने मारहाण केल्याच्या घटना घडत आहेत. आता तर पोलिसांनाच मारण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे.
अशातच आता पिंपरी शहरातून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस ठाण्यासमोर वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या ज्युसच्या तीन गाड्या, टेम्पो आणि दुचाकीवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात होती. त्यावेळी कारवाईला विरोध करत कुटंबातील तिघांनी अतिक्रमण विभागातील अधिकार्यांना शिवीगाळकरून मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
हा प्रकार दिघी पोलीस ठाण्यासमोर घडला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस अंमलदार सुधीर डोळस यांनी दिघी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. कंठाराम दामोदर (वय-५२), आशिष कंठाराम दामोदर (वय-२०) नलुबाई कंठाराम दामोदर अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी यांच्या ज्युसच्या तीन गाड्या आहेत. टेम्पो व दुचाकी पोलीस ठाण्यासमोर आडवी लावल्याने पोलीस ठाण्यामध्ये येणार्या – जाणार्या नागरिकांचा व पोलिसांचा वाहतुकीचा रस्ता अडविला जात होता. आरोपींची वाहने काढण्यासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी आले असता कारवाईला विरोध करीत एकाच कुटंबामधील तिघांनी अतिक्रमण विभागातील अधिकार्यांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच त्यांनी पोलिसांना मारहाण केली.
दरम्यान, आरोपींनी त्यांच्याकडील पेट्रोल स्वत:च्या आणि पोलिसांच्या अंगावर टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न देखील केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंभोरे करीत आहेत.