सातारा : राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात सद्या जोरदार चर्चा सुरु आहे. राज्य सरकारची ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरीम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केली होती. या योजनेला अल्पवधीतच मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आता लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणाऱ्या होर्डिगवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली की काय असं बोललं जात आहे.
सातारा शहरातील पोवई नाक्यावर लावण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणाऱ्या होर्डिगवरून अजित पवार यांचा फोटो गायब आहे. या होर्डिंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसत आहे. परंतु, या होर्डिंगवर फडणवीस समर्थकांनी अजित पवार यांचा फोटो लावला नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
लाडकी बहीण योजना..
अंतरीम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली, या योजनेंतर्गत पात्र असलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलेंच्या खात्यात दर महिन्याला सरकारकडून दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत.