मुंबई : राज्यातील पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा आठ वाजता भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु पालकवर्गाने नऊची वेळ बदलण्यास विरोध केला असून राज्यपालांच्या सुचनेनुसार काही महिन्यांपूर्वी शाळेची वेळ बदलत ९ वाजता केली होती. मात्र आता पुन्हा त्यात बदल होण्याच्या हालचाली होताना दिसत आहे.
राज्यातील पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाला शाळांनी योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे या धोरणात लवकरच बदल केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 ऐवजी 8 वाजता सुरू होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
मात्र या निर्णयाला विरोध होण्याची दाट शक्यता आहे. या मागील कारण म्हणजे 9 ची वेळ विद्यार्थ्यांसाठी सोयीची असून त्यांची रात्री पूर्ण वेळ झोप होते. तसेच नोकरी करणारे पालकही सकाळची कामं पूर्ण करून, मुलांसाठी डबा, नाष्टा देऊन त्यांना शाळेत सोडू शकतात, असं पालक म्हणत आहे.
मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी तत्कालीन राज्यपालांच्या सूचनेनुसार राज्यातील पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आला होता. तेव्हा राज्यातील पालक, शिक्षक संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केले होतं. परंतु काही मोजक्या संस्थाचालकांनी विरोध दर्शवत सरकारचा निर्णय फेटाळून लावला होता. त्यामुळे आता बॅकफूटवर गेलेल्या शालेय शिक्षण विभागाने आठ वाजताची मध्यममार्गी भूमिका घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.
सकाळी लवकर शाळा का नाही..?
अनेक मुले उशिरापर्यंत जागे असतात. तरीही त्यांना शाळेत जाण्यासाठी लवकर उठावे लागते. यामुळे मुलांची झोप पूर्ण होत नाही. हिवाळा आणि पावसाळ्यात सकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्यामुळे ते आजारी पडतात. सकाळी मुलांसाठी जेवणाचा डबा तयार करणे आणि वेळेत शाळेत सोडणे, यामुळे अनेक पालकांची धावपळही होते. मात्र आता पालकांची सोयीची ९ ची वेळ टाळून शिक्षण विभाग मध्यममार्ग काढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.