पुणे : दारूच्या वादातून मित्राच्या गुप्तांगावर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना शेवाळवाडी बसथांब्याशेजारी मंगळवारी (ता.१५) रात्रीच्या सुमारास घडली आहे. तर आरोपी कुटुंबासह पोबारा करून फरार झाला आहे.
अरुण किसन सूर्यवंशी (वय ५४, रा. शेवाळवाडी बसथांब्याशेजारी, मांजरी, मूळ रा. कर्नाटक) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. पिताराम केवट (वय २३, रा. शेवाळवाडी बसथांबाशेजारी, मांजरी, मूळ मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण अरुण सूर्यवंशी (वय २५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिताराम आणि अरुण सूर्यवंशी हे शेजारी शेजारी राहत होते. आणि दोघेही एकाच नर्सरीत कामाला होते. मंगळवारी (दि. १५) सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर ते दोघे दारू पिण्यासाठी गेले.
त्यानंतर आरोपी पिताराम हा एकटाच घरी परतला. त्यामुळे मृत अरुण यांच्या कुटुंबीयांनी पिताराम याच्याकडे चौकशी केली अरुण कुठे आहे. तेव्हा आरोपी पिताराम याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि मला काही माहिती नसल्याचे सांगितले. व त्याच रात्री आरोपी पिताराम हा घरातील सर्व सामान व पत्नीला घेऊन पसार झाला.
दरम्यान, अरुण सूर्यवंशी यांचा मृतदेह आढळून आला. व आरोपी फरार झाल्यानंतर लक्ष्मण सूर्यवंशी यांनी तातडीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पिताराम केवट याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.