संतोष पवार
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड, बीएड पात्रताधारक बेरोजगार शिक्षकाची नियुक्ती करण्याचा अध्यादेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकदिनी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कंत्राटी शिक्षकाला 15 हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार असून त्याला कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील.
राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतीलच,असे नाही. त्यामुळे अशा ठिकाणी रिक्त असलेल्या पदांवर बीएड, डीएड पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांची नियुक्ती करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात असल्याचे अध्यादेशात म्हटले आहे.
नियुक्त केल्या जाणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकाची कमाल वयोमर्यादा 70 वर्ष राहील. राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाचीच नियुक्ती केली जाईल. कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केल्या जाणाऱ्या शिक्षकाला केवळ एका वर्षाचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर त्याची गुणवत्ता व योग्यता विचारात घेऊन नियुक्तीच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात येईल. मात्र, ही वाढ तीन वर्षापेक्षा जास्त असणार नाही. संबंधित शिक्षक हा शारीरिक, मानसिक व आरोग्य दृष्ट्या सक्षम असावा, अशी अटही या अध्यादेशात स्पष्टपणे देण्यात आली आहे.
कमी पटसंख्येच्या शाळेत कंत्राटी पद्धतीवर शिक्षक नियुक्त केले जातील. मात्र, शाळेची पटसंख्या 20 पेक्षा जास्त झाल्यास नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत संबंधित शिक्षकाची सेवा सुरू राहील. नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा संपुष्टात येईल. तसेच ज्या 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये दोन नियमित शिक्षक कार्यरत आहे. त्यातील एका शिक्षकाची जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये समुपदेशाने बदली करावी. ही बदली करताना दोन्ही शिक्षकांची संमती घ्यावी. तसेच कंत्राटी शिक्षक शाळेत नियुक्त होत नाही. तोपर्यंत बदली करू नये, असेही या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.