पुणे : गैरवर्तणूकीचा अहवाल तयार करून खुल्या कारागृहातून मध्यवर्ती कारागृहात पाठवीले जाईल असे सांगून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येरवडा कारागृहातील हवालदारासह एका महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता.१८) रंगेहाथ पकडले.
बाजीराव ज्योतीबा पाटील (वय ५४,पद- कारागृह हवालदार, खुले कारागृह, येरवडा, पुणे) आणि रिहाना आसिफ सय्यद (वय-४८, कारागृह आवारातील कॅन्टीनमधील महिला कर्मचारी खाजगी) असे पकडलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी ३० वर्षीय तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे येरवडा खुले कारागृह येथे शिक्षा भोगत असून सध्या ते संचित रजेवर आहेत.
त्यांच्या रजेच्या कालावधीमध्ये बोलावून यातील लोकसेवक कारागृह हवालदार बाजीराव पाटील यांनी तक्रारदार यांची रजा संपण्यापूर्वी जर त्याने ५० हजार रूपये दिले नाहीत तर त्याच्या गैरवर्तणूकीचा अहवाल पाठवून खुल्या कारागृहातून मध्यवर्ती कारागृहात पाठवीले जाईल.
असे सांगून तक्रारदाराकडे ५० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती लोकसेवक कारागृह हवालदार बाजीराव पाटील यांना ३५ हजार रुपये देण्याचे ठरले होते.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुल्या कारागृहाच्या आवारात सापळा रचला. तेव्हा कॅन्टीनमध्ये १५ हजार रुपयांची लाच रिहाना सय्यदने स्वीकारल्यावर त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शितल घोगरे करीत आहेत.