पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बहिणीच्या सासूबाईच्या मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून सही केल्यामुळे एकाचे अपहरण करुन त्याला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ४ जून २०२४ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी दिलीप बबन इंगळे (वय-५६, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून, हडपसर पोलिसांनी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोपट बबन शेंडकर (वय-५५, रा. फातिमानगर), सौरभ पोपट शेंडकर (वय-२४), सुनिल किसन शेंडकर (वय-४१, रा. फातिमानगर), समीर रामदास शेंडकर (वय-३८, रा. आझादनगर, वानवडी), गणेश रामदास शेंडकर (वय-३३), महेश दत्तात्रय शेंडकर (वय-३३), विघ्नेश ज्ञानेश्वर शेंडकर (वय-१९, रा. धाडगेनगर, फातिमानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप इंगळे यांची बहिण सुशिला जयसिंग शेंडकर यांच्या सासूबाई तुळसाबाई बबन शेंडकर यांनी महम्मदवाडी येथील परिसरातील ६ गुंठे जागेचे मृत्युपत्र तयार केले होते. येथील जागा जयसिंग शेंडकर यांच्या नावावर केली होती. या जागेच्या मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून फिर्यादी यांनी सही केली होती. जयसिंग शेंडकर यांनी ही जागा तुळसाबाई शेंडकर यांना फसवून घेतली आहे, असे आरोपींचे म्हणणे आहे.
दरम्यान, फिर्यादी यांचे साडेसतरानळी येथील साईटवरुन अपहरण करून आरोपींनी जबरदस्तीने इर्टिगा कार मध्ये बसविले. अन त्यांना जयसिंग शेंडकर यांच्या घरी घेऊन गेले. तेथे त्यांना लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. त्यात फिर्यादीच्या पाठीला तसेच पाठीच्या मणक्याला मोठया प्रमाणात दुखापत झाली आहे. फिर्यादीचे दाजी जयसिंग यांनी मोबाईलमध्ये व्हाईस रेकॉर्डींग केली म्हणून त्यांना देखील आरोपींनी मारहाण केली़ आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हसिना शिकलगार करीत आहेत.