पुणे : पुण्यातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी व्यापक मोहीम सुरु केली आहे. अशातच हडपसर पोलिसांनी धमाकेदार कामगिरी करत अट्टल चोरटा ‘जोजो’ कडून तब्बल 24 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. मांजरी, मुंढवा, लोणीकाळभोर, लोणीकंद भागात ‘जोजो’ दुचाकी चोरीसाठी प्रसिद्ध झाला होता.
याप्रकरणी दिपक उर्फ जोजो बाबुराव सरवदे (वय-30 रा. थोरात वस्ती, द्वारका मेडीकल समोर कोलवडी रोड, मांजरी, पुणे) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
हडपसर पोलीस ठाणे हद्दीत वाहनचोरी प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार दिपक कांबळे आणि चंद्रकांत रेजितवाड यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार आरोपी दिपक उर्फ जोजो बाबुराव सरवदे याला ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता त्याने मांजरी, मुंढवा, लोणीकाळभोर, लोणीकंद, या भागातुन वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर यापुर्वी पुणे शहरात मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
आरोपी “जोजो” याचा मागिल काही महिन्यापासून हडपसर तपासपथक शोध घेत होते. मात्र तो मिळून येत नव्हता. आरोपीचे ठावठिकाण्याबाबत खात्रीलायक माहीती प्राप्त करून त्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, आरोपीकडून 24 गुन्हे उघडकीस झाले असून 12 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 9 होंडा शाईन, 4 हिरोहोंडा पेंशन, 4 स्पलेंन्डर, 2 हिरो होंडा डिलक्स, 2 अॅक्टीव्हा, 1 अॅव्हेंनजर, 1 होंडा डिओ, होंडा ड्रिमयुगा अशा 24 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व दुचाकी पुणे शहर, धाराशिव आणि लातुर या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आल्या आहेत.
24 गुन्हे उघडकीस
हडपसर पोलीस स्टेशन-19, मुंढवा पोलीस स्टेशन-02, लोणीकंद पोलीस स्टेशन-02, आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन-01 असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.