संदीप बोडके
लोणी काळभोर : नागरिकांच्या थेट मदतीसाठी शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना ऑनलाईन राबवल्या जातात. त्यामधील सातबारावरील “ई फेरफार” ही एक महत्वपूर्ण योजना मानली जात असताना हवेली तालुक्यातील तलाठी यास अडथळा ठरत आहेत. फेरफारच्या १५ दिवसांच्या कामास हडपसरचे तलाठी स्वरुपकूमार पवार यांनी “टेक्नीकल प्रॉबलेम्स”चे कारण देत सुमारे शंभर दिवस उशीर लावल्याने महसूल विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
हडपसरमधील शेकडो फेरफार हे प्रोटोकॉलसाठी तलाठीनिर्मित ‘प्रलंबित’ सापळ्यात अडकले आहेत. अधिकाऱ्यांच्या या ‘प्रलंबित’ कारभाराने शासकीय योजना बदनाम होऊ लागल्या आहेत. एकूणच शासनाच्या ई फेरफार योजनेला उघडपणे हडपसरच्या वेशीवरच अडवल्याचा प्रकार समोर आला आहे.
हडपसर येथील सर्व्हे नंबर ५२ मधील जमिनीचा २४ मे २०२४ ला दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक ६ मध्ये रजिस्टर वाटपपत्राचा दस्त झाला आहे. त्याचवेळी ई-फेरफार झालेला आहे. त्याची माहिती संबधित तलाठ्याला त्याच दिवशी म्हणजे २४ मे रोजी प्राप्त झाली. मात्र, संबंधित ई-फेरफार तलाठ्याने १९ दिवसाच्या विलंबाने म्हणजे १३ जून रोजी फेरफार नोंद क्रमांक ५४४९६ अन्वये दफ्तरी घेतला. यावरुन पवार तलाठी हे ई-फेरफार विषयी किती कार्यतत्परतेने काम करतात, याची प्रचिती येत आहे.
हडपसर येथील प्रस्तुतचा फेरफार क्रमांक ५४४९६ हा १३ जूनला तलाठी दफ्तरी दाखल आहे. वास्तविक नोंदणीकृत दस्ताच्या ई-फेरफारची नोटीस त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी (१४ जून) ऑनलाईन भरणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित तलाठी स्वरुपकूमार पवार यांनी फेरफारची नोटीस तब्बल ६४ दिवसांच्या विलंबाने ऑनलाईन भरलेली दिसत आहे. अशाप्रकारे तलाठी विलंबाच्या कारभाराने नागरिकांची मुस्कटदाबी करत आहेत. ऑनलाईन दस्त होऊनही सुमारे शंभर दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर संबधित फेरफार पुढे सरकत नाही. त्यामुळे सातबारावर फेरफाराचा अमंल कधी होणार, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यातच नागरिक ई-फेरफारबाबत अद्याप अज्ञानी असल्याने तलाठी त्याचा गैरफायदा घेत आहेत.
शासनाची ई-फेरफार योजना काय आहे?
जमिनीच्या सातबारावरील रजिस्टर दस्तऐवजांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात होत असते. यामध्ये प्रामुख्याने खरेदीखत, बक्षिसपत्र, वाटपपत्र, बँक कर्ज बोजा किंवा गहाणखत, हक्कसोडपत्र इत्यादी दस्त होत असतात. हे दस्त नोंदणी करताना संबधित जमिनीच्या दस्ताचा फेरफार दुय्यम निबंधक कार्यालयातच तयार होतो. यालाच ई-फेरफार म्हणतात. रजिस्टर दस्त नोंदणी झाल्यास प्रस्तूतचा फेरफार हा ज्या त्या गावी तलाठी दफ्तरी ऑनलाईन जात असतो. त्यामुळे तो ई-फेरफार सातबारावर घेणे तलाठ्यांवर बंधनकारक असते. त्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही, अशी ई-फेरफार योजना आहे. मात्र, या योजनेला वेशीच्या फाट्यावर मारण्याची किमया हडपसरच्या तलाठ्याने साधली आहे. त्यामुळे शासनाची ई-फेरफार प्रणाली बदनाम होत आहे.
हडपसर येथील फेरफार नबंर ५४४९६ या अगोदरच्या शभंर फेरफारांपैकी एका म्हणजेच ५३४९६ या फेरफार नोंदीला टेक्नीकल प्रॉबलेम होता, त्यामुळे त्या पुढील फेरफारांची नोटीस भरता आलेली नाही. सदरचा प्रॉबलेम २० ऑगस्टला क्लिअर झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये हा प्रॉबलेम सोडवला जाईल.
-स्वरुपकूमार पवार, तलाठी हडपसरज्या फेरफार क्रमांकाला तलाठ्याने विलंब लावला आहे, त्याची माहिती मला पाठवा. त्यानतंर मी खातरजमा करुन विस्तृतपणे माहिती देतो.
– सचिन आखाडे, महसूल नायब तहसीलदार हवेली
याविषयी हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांची याबाबत प्रतिक्रिया समजू शकली नाही.