पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात तुरळक पावसाने हजेरी लावली. मात्र, चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात रात्री आठ वाजल्यापासून २१४० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. सध्या चारही धरणांमधील पाणीसाठा ९८.७८ टक्क्यांवर पोहोचला असून जिह्यातील लघु, मध्यम असे २० धरण प्रकल्प १०० टक्के भरल्याने पुणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली असून बळीराजा देखील सुखावला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधील पाणीसाठा २८.७९ अब्ज घनफूट (टीएमसी) जमा झाला आहे. खडकवासला धरणातून सकाळी सहा वाजल्यापासून ८५६ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. दिवसभर हा विसर्ग कायम ठेवण्यात आला, तर रात्री आठ वाजल्यापासून मुठा नदीत २१४० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात पावसाने विघश्रांती घेतली. वरसगाव धरण परिसरात दोन मिलिमीटर, पानशेत धरणक्षेत्रात तीन मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात चार मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सध्या टेमघर धरणातून वीजनिर्मितीसाठी २७५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. वरसगाव आणि पानशेत धरणांमधून वीजनिर्मितीसाठी प्रत्येकी ६०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात १८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सध्या हे धरण १०० टक्के भरले असून या धरणातून १४०० क्युसेकने वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यातील इतर धरणांपैकी विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, कासारसाई, निरा देवघर, भाटघर, वीर आणि नाझरे ही धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे या धरणांमधून कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी हे धरण देखील १०० टक्के भरले आहे. जिल्ह्यातील विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने उजनी धरणातून भीमा नदीपात्रात १५ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, कंसात टक्क्यांत
टेमघर ३.७१ (१००), वरसगाव ९९.१० (१००), पानशेत १०.५४ (९८.९७), खडकवासला १.८४ (९३. ३१), भामा आसखेड ७.६७ (१००), पवना ८.५१ (१००), माणिकडोह ६.५० (६३.८५), येडगाव १.६८ (८६.५२), वडज ०.९८ (८३.९६), डिंभे १२.२९ (९८.३९), घोड ४.६७ (९५.७६), विसापूर ०.९० (१००), कळमोडी १.५१ (१००), चासकमान ७.५७ (१००), वडीवळे १.०७ (१००), आंद्रा २.९२ (१००), कासारसाई ०.५७ (१००), गुंजवणी ३.५६ (९६.३९), निरा देवघर ११.६८ (९९.५७), भाटघर २३.४० (९९.५६), वीर ९.४१ (१००), नाझरे ०.५९ (९९.९८) आणि उजनी ५५.६० (१००)