मुंबई : जनसन्मान यात्रेचा दुसरा टप्पा नुकताच पार पडला असून तिसऱ्या टप्प्याच्या नियोजनाबाबत पक्षात चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने मतदारसंघनिहाय आढावा आणि त्याचे नियोजन याबाबतही सविस्तर चर्चा झाल्याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले.
महायुतीच्या बैठकीत जागावाटपाचे सूत्र ठरवण्याविषयी प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यानुसार पक्षाने करायच्या तयारीबाबतही आम्ही बोललो, असे सांगून तटकरे म्हणाले, आता गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे, जनसन्मान यात्रेला काही दिवस विश्रांती दिली आहे. मात्र, त्या काळात पक्षाचे विविध सेल कार्यरत राहतील, याची काळजी घेतली जाईल.
अजितदादा जे बोलले, त्याचा अर्थ आम्ही ६० जागा लढवणार असा नाही, पक्षाने ५४ जागा जिंकल्या आहेत, याकडे लक्ष वेधण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आता पक्षासोबत अपक्षही जोडले गेले आहेत. ते आणि आमच्या मित्रपक्षांसह संख्या ६० च्या आसपास होते. ती धरून तुम्ही पुढे चला, असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता, असेही त्यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
लोकसभेला विजयी जागांचे सूत्र होते. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जागा होत्या. शिवसेना व भाजप यांनी जास्त जागा लढवल्या होत्या. आता विधानसभेला ‘निवडून येण्याची क्षमता’ हे सूत्र असावे, असे महायुतीच्या बैठकीत ठरले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.