पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.
गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप करत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून विद्यमान मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल झाला आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समर्थक असणाऱ्या गिरीश महाजन यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. विरोधी पक्षनेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे आणि विशेष सरकारी वकील असणारे प्रवीण चव्हाण यांच्या दोघातील रेकॉर्डिंगचा एक पेन ड्राईव्ह देखील विधानसभा अध्यक्षांना दिला होता. याच प्रकरणांमध्ये आता अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.
धन्यवाद…
देवेंद्रजी फडणवीसमाझ्यावर #CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता – न डगमगता मी #BJP च्या या दडपशाही…
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 4, 2024
गुन्हा दाखल होताच अनिल देशमुखांनी एक पोस्ट शेअर केली, धन्यवाद… देवेंद्रजी फडणवीस, माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवींसाच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरु झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता, न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे, अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवींसाना इशारा दिला आहे. तसेच, धन्यवाद देवेंद्रजी म्हणत देवेंद्र फडणवीसांचे आभारही मानले आहेत.