पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपण दिव्यांग आयुक्त असून दिव्यांग कोट्यातून तुम्हाला वाईन शॉपचे लायसन्स काढून देण्याच्या बहाण्याने एका दिव्यांगाला तब्बल 39 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सुपर बिबवेवाडी येथील ४३ वर्षाच्या कंट्रक्शन ठेकेदाराने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विजय दामोदर म्हस्के (रा. नातेपुते, जि. सोलापूर), संजय कुलकर्णी ऊर्फ के. के. राव, लोंढे बाई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
विजय म्हस्के हा देखील अपंग आहे. अपंग असल्याचा गैरफायदा घेऊन त्याने अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. यातील फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही अपंग असल्यामुळे अपंगच अपंगाची फसवणूक करत असल्याचे दिसत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दोन्ही पायांनी अपंग आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांच्या एका मित्राने आरोपी विजय म्हस्के याच्याशी ओळख करुन दिली होती. म्हस्के याने आपण दिव्यांग आयुक्त असल्याचे भासवून त्यांना मुलगी पाहण्यास सांगितले. त्यानिमित्ताने त्यांचे बोलणे सुरु होते. पुणे रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्मवर स्रॅक्स सेंटर स्टॉल मिळेल का? अशी विचारणा फिर्यादी यांनी म्हस्केकडे केली. त्यांनी ते मिळवून देण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी दोन लाख रुपये घेतले. त्यांच्याकडे पैसे असल्याचे दिसल्यावर त्यांनी मी दिव्यांग आयुक्त आहे, तोपर्यंत मोठा फायदा करुन घ्या असे सांगून त्यांना वाईन शॉपचे लायसन्स मिळवून देतो, असे सांगितले.
त्याकामासाठी ४८ लाख रुपये खर्च येणार आहे, असे सांगितले. फिर्यादी यांनी डिसेबर २०२३ ते मार्च २०२४ या काळात वेळोवेळी म्हस्के याच्या खात्यात ३९ लाख ८३ हजार रुपये भरले. दरम्यान, १९ जानेवारी २०२४ रोजी म्हस्के याने त्यांना मंत्रालयात नेले. त्यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे लेटर हेडवर अपर आयुक्त यांची स्वाक्षरी असलेले पत्र आणले. त्यावर लायसन्स होल्डर म्हणून फिर्यादी व त्यांच्या पत्नीची स्वाक्षरी घेतली. या वेळी संजय कुलकर्णी हे देखील त्या ठिकाणी होते. कुलकर्णी हा अपंगासाठी लायसन्सची व शासकीय सबसिडीची कामे करुन देत असल्याचे म्हस्के यांनी फिर्यादी यांना सांगितले.
फिर्यादी यांना लायसन्स मिळणार असल्याचा विश्वास त्याने दिला असला तरी तो वेगवेगळी कारणे देत टाळाटाळ करु लागला. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीला पैसे परत मागितले तेव्हा त्यांनी कोरे चेक दिले. मात्र, खात्यात पैसे नसल्याने ते परत आले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.