पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेश पेठेतीळ एका ज्येष्ठ महिलेच्या घरात घुसून एका दारूड्याने महिलेचा गळा आवळून पाठीवर आणि मांडीवर चावा घेतला आहे. तसेच महिलेचा उशीने गळा दाबून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हि घटना २ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गणेश पेठ येथे घडली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. विक्रम जोगी विश्वकर्मा (रा. सदाशिव पेठ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका ६० वर्षीय महिलेनी फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
चंपा कुदळे नावाची ६० वर्षांची महिला दहा वर्षांपासून भाडेतत्त्वावर राहते. त्यांची मुलगी आंबेगाव पठार यथे राहण्यास आहे. ती व तिचे पती अधून- मधून त्यांना भेटण्यासाठी येतात. दि. २ सप्टेंबरला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्या झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा दरवाजा कोणी तरी वाजवला. त्यांना वाटले त्यांच्या जावयाने दरवाजा वाजवला. त्यांनी दरवाजा उघडला, तेव्हा एक दारूडा
लगेच घरात घुसला. त्यावर फिर्यादी यांनी त्याला तू कोण आहे रे, इथे कशाला आला आहे, काय काम आहे तुझं, थांब माझ्या जावायाला फोन लावते, म्हणताच त्याने महिलेला ढकलून देत त्यांच्या तोंडावर बुक्की मारली. त्यांचा गळा दाबला. या वेळी आरडाओरडा करून
बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना त्या दारुड्याने महिलेला हाताने मारहाण करून जोरात ढकलून दिले. महिलेच्या अंगावर बसून उशीने त्यांचे तोंड दाबून खुनाचा प्रयत्न केला. त्याने या वेळी डाव्या बाजूच्या खाद्यांवर व पाठीवर तीन ते चार ठिकाणी चावा घेतला. या वेळी आरडाओरडा पाहून नागरिकांनी पोलिसांना फोन केला.
पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याचे नाव विक्रम जोगी विश्वकर्मा (वय ३०, रा. सदाशिव पेठ) असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महिलेला ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र आरोपीने हे कृत्य का केले याचा पोलिस शोध घेत आहेत.