लोणी काळभोर : लोणी काळभोर येथील एमआयटी शौक्षणिक संकुलात चुलत भावाचा प्रवेश घेण्यासाठी निघालेल्या कुटुंबियांच्या चारचाकीला भरधाव डंपरचालकाने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात विक्रीकर अधिकाऱ्यासह त्यांच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गणेशवाडी एच.पी. पेट्रोल पंपाजवळ रविवारी (ता. 01) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. याप्रकरणी डंपरचालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजीत सुरेश पवार (वय -36, विक्रीकर अधिकारी), व सुरेश प्रभाकर पवार (वय 62 रा. बकोरी फाटा, वाघोली, पुणे) असे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मुलगा अनिकेत सुरेश पवार (रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपरचालक संदेश लक्ष्मणराव पवार (वय 33, रा. वाघोली, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहनचालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत पवार हे महाराष्ट्र शासन विक्रीकर निरीक्षक अधिकारी या पदावर कार्यरत होते. अभिजीत पवार व कुटुंबीय हे लोणी काळभोर येथील एमआयटी शौक्षणिक संकुलात चुलत भावाच्या प्रवेशासाठी वाघोली येथून निघाले होते. थेऊर वरून लोणी काळभोरकडे येत असताना थेऊर हद्दीत भरधाव डंपरने चारचाकीला समोरून जोरात धडक दिली.
या अपघातात अभिजीत पवार यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी शेजारी बसलेल्या वडिलांना नागरिकांच्या मदतीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचेही निधन झाले. याप्रकरणी डंपर चालक संदेश पवार याच्यावर दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत.