– बापू मुळीक
जेजुरी : जेजुरी येथील विस्तारित एमआयडीसी प्रकल्पातून मावडी कडेपठार गावची 2400 एकर जमीन अखेर वगळण्यात आली आहे. ही जमीन संपादनातून काढण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने आज राजपत्र प्रसिद्ध केले. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे शेतकऱ्यांसह बैठक घेऊन यासाठी केलेला पाठपुराव्याला यानिमित्ताने यश आले.
याबाबत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, अनेकांनी मावडी ग्रामस्थांना शिक्के काढण्याचा शब्द दिला. पण केवळ मतांसाठी अशी आश्वासने देऊन या लोकांची केवळ फसवणूक केली. विद्यमान आमदारांनीही शेतकऱ्यांना वारेमाप आश्वासने देऊन मते लाटली. विद्यमान आमदार आणि खासदार महाविकास आघाडी सत्तेत असताना हे विषय मार्गी लावू शकले असते पण त्यांचा नाकर्तेपणा पुरंदरला अनेक वर्ष मागे घेऊन गेला आहे, असा घणाघातही शिवतारे यांनी केला.
हत्तीवरून मिरवणूक काढणार – अमोल चाचर
माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यामुळे आज आमच्या गावात दिवाळी साजरी झाली. हे काम केल्यास हत्तीवरून मिरवणूक काढणार असा शब्द आम्हीही शिवतारे यांना दिला होता. तो आम्ही पूर्ण करणार असे यावेळी माजी सरपंच अमोल चाचर यांनी सांगितले