पुणे : मध्य रेल्वेने पुणे ते नागपूर यादरम्यान द्वि-साप्ताहिक एसी सुपर फास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे ते नागपूरदरम्यान एकूण १४ स्पेशल गाड्या २१ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या दरम्यान धावणार आहेत. नागपूर-पुणे सुपरफास्ट (ट्रेन क्र.०१२०१) एसी स्पेशल गाडी २१ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी नागपूरहून सुटणार आहे.
तसेच दुसऱ्या दिवशी पुण्याला सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी पोहोचणार आहे. तर, पुणे-नागपूर सुपरफास्ट (ट्रेन क्र. ०१२०२) एसी स्पेशल गाडी २२ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पुण्याहून मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहोचणार आहे. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन आणि उरुळी आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.