-गोरख जाधव
डोर्लेवाडी : डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे ग्रामविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून डोर्लेवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत डोर्लेवाडी समोर शनिवार (ता. 30) पासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत चक्रीउपोषण सुरु केले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 15 ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा करण्याअगोदर नियमानुसार महिला ग्रामसभा घेणे गरजेचे होते. हा महिलांचा अपमान झाल्यासारखे आहे. ग्रामसभा हि ठरलेल्या तारखेच्या आत किमान चार दिवस अगोदर गावामध्ये दवंडी देणे गरजेचे होते. परंतु 30 ऑगस्ट रोजी सकाळी आयोजित केलेल्या ग्रामसभेची ग्रामपंचायतीने 30 ऑगस्ट रोजी सकाळी एक तास अगोदर दवंडी दिली होती. त्यामुळे ग्रामसेवक जनतेची दिशाभूल करत आहेत.
ग्रामस्थांनी याबाबत विचारले असता ग्रामसेवकांनी नेहमीप्रमाणे अरेरावीच्या भाषा वापरून उत्तरे दिली. त्यामुळे डोर्लेवाडी येथील ग्रामस्थांनी शनिवारी दुपारी 1 वाजे पर्यंत उपोषण केले. ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून काहीच लेखी स्वरूपात उत्तर आले नसल्याने ग्रामस्थांनी बारामतीचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, बारामती शहर पोलिस ठाणे, ग्रामविकास अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन बेमुदत चक्री उपोषण सुरु केले आहे.
दरम्यान, ग्रामविकास अधिकारी यांची बदली व्हावी यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लेखी निवेदन दिले आहे. उपोषणस्थळी तंटामुक्ती माजी अध्यक्ष दादासो नवले, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत जाधव, बापूराव निलाखे, माजी उपसरपंच विनोद नवले, अॅड. अतुल भोपळे, सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख, रणजित भोपळे, दिलीप चौधरी, बाळासाहेब फडतरे, सौरभ नवले, सुरज नवले, सागर नवले, अमोल भोसले, राहुल जाधव, अमोल शिंदे, अण्णा गाडे आदी उपस्थित होते.
काही तांत्रिक अडचणीमुळे ग्रामसभेपूर्वी दवंडी देता आली नाही. महिलांच्या अडचणी दूर करण्याचा ग्रामपंचायत प्रशासन नेहमीच प्रयत्न करीत आले आहे. दवंडी न दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून पुन्हा नव्याने महिला सभा व ग्रामसभा दवंडी देऊन घेऊ. याबाबत उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा केली मात्र काही नागरिक व विरोधी गटातील ग्रामपंचायत सदस्य लेखी माफी मागण्याच्या निर्णयावर ठाम होते. काही जणांची मनाप्रमाणे वैयक्तिक कामे केली नाहीत, त्याचा राग मनात धरून जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्धेशाने उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
– आर. टी. कारंडे, ग्रामविकास अधिकारी, डोर्लेवाडी, ता. बारामती)सात दिवस आगोदर ग्रामसभेचा अजेंडा पत्रक मिळणे अपेक्षित होते. पण आम्हाला एक दिवस अगोदर ग्रामविकास अधिकारी डोर्लेवाडी यांच्याकडून पत्रक मिळाले आहे. लोक जमू नये कोरम अभावी सभा तहकूब करून पुढे अचानक तहकुब झालेली ग्रामसभा घेऊन चुकीच्या पद्धतीने ठरव मंजूर करण्याचा मनसुभा ग्रामपंचायत प्रशासनाचा आहे. मनमानी कारभाराविरोधात मुख्य गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज देऊन ग्रामसेवकाची बदली करण्यासाठी आव्हान केले होते. तीन महिने लोटले तरी त्यांच्याकडून काहीही दखल घेतली गेली नाही. बिडिओ ग्रामसेवकाला पाठीशी घालतायत हे यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने बेमुदत चक्री उपोषणात सहभागी आहोत.
– सचिन निलखे व प्रशांत जाधव, सदस्य ग्रामपंचायत डोर्लेवाडी, ता. बारामती)जनरल ग्रामसभेच्या आगोदर विशेष महिला ग्रामसभा घेणं क्रमप्राप्त असून देखील डोरलेवाडी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामसेवक यांचेकडून जाणून-बुझून महिला ग्रामसभा घेतली नाही हा समस्त महिला भगिनींचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत व ग्रामसेवक डोरलेवाडी यांचा जाहीर निषेध करतो. ग्रामसेवकांच्या साततच्या तक्रारींना व मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही ग्रामसेकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई होणे साठी बेमुदत चक्री उपोषण चालू केले. आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले तर गुरुवारपासून उपोषणाची तीव्रता वाढवून आमरण उपोषण करणार आहोत.
-दादासाहेब नवले, अॅड.अतुल भोपळे, जावेद शेख उपोषणकर्ते