पुणे : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याला निषेध म्हणून आज पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालायवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा देखील दिल्या आहेत.
तसेच पंडित जवाहरलाल नेहरुंनी सावरकरांची माफी मागितल्याचे पोस्टर देखील याठिकाणी लावण्यात आले. याबाबत पुणे पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी भाजप कार्यकर्त्यांची धरपकड केली. पोलिसांनी याप्रकरणी १५ भाजप कार्यकर्ते ताब्यात घेतले आहेत .काही काळ जोरदार घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.
दरम्यान, यावेळी मनसेचे सैनिक देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर आक्रमक झाले असून त्यांच्या पदयात्रा रोखण्यासाठी मनसे सैनिक बुलढाण्याच्या दिशेने निघाले होते. यावेळी पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांना ताब्यात घेतले आहे.