पुणे : राज्यात पाऊस सक्रिय झाला असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसत आहे. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठा जलसाठा जमा झाला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
‘या’ भागात अलर्ट जारी..
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्व विदर्भ आणि तेलंगणावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे. येत्या 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली तसेच वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसा अंदाज आहे.
नाशिकमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण..
नाशिकमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असून सोलापूर, सांगली, कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह उपनगरातही पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार..
घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या पाणीसाठ्यात यंदा भरघोस वाढ झाली असून जवळपास 97 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे.